|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
श्री गणेशायनमः। श्री गुरुभ्योनमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री मुऱ्हादेव्यैनमः । श्रीसरस्वत्येनमः ।
ओम प्रथम नमन गणपतीसी। विघ्नेश्वर विनायकासी ।। तुज ठाऊक सर्व गाथेसी। प्रेरणा मज देई ॥ १ ॥
तुझ्या स्मरणे विघ्ने जाती। विद्या येई झडकरी ।। लिखाणा येई गती। स्मरणशक्ती आगळी ॥ २ ॥
व्यासे लिखाणी। योजिले तुम्हासी ।। त्याने लिखाणे पूर्ण झाली। तैसे माझे करी ॥३॥
लंबोदरा तुला स्मरता । ठाऊक मज नसता गाथा ।। प्रेरणा तुझी होता। उणीव नाही जाणा ॥४॥
श्री विष्णुदास गुरु स्मरणी। कार्य साधे सर्व निश्चिती ।। सर्व देव आपुलेचि ठायी। काही न पडे कमी ।।५।।
गुरु प्रकाशी जे दिसे। ते लिखाणही गुरुकृपे ।। नाही कांही त्यात माझे। असती चुका दोष माझे ।।६।।
नमस्कार शेगाववासी । गजानन महाराजांसी ।। श्री कुलदेवतांसी। साष्टांग नमस्कार करुनी ।।७।।
कोल्हापूरवासी महालक्ष्मी । भक्तकाजा गणोजास प्रकटसी ।। लोटांगण माये तवचरणी। मायेची करा इच्छा पूर्ती ।।८।।
साष्टांग प्रणाम ऋषीमुनींसी। संत महंता नमुनी ।। नमस्कार करितो सरस्वतीसी। प्रेरणा दे मुहादेवी ग्रंथी ।।९।।
नतमस्तक मातापिता चरणी। नमन कुळवंश पूर्वजांशी ।। प्रेरणा सर्व परब्रह्माची। मधुरता आणा त्यामध्यी ।।१०॥
अतर्क्स आहे तव लीला। अदृश्य सृष्टीचा खेळ चालला ।। निर्गुण निराकार परब्रह्माचा। कोण जाणे त्याला ।।११।।
कल्पनां नसता आधी। घटना घडती कांही ।। ती माया घडवी त्यासी। प्रचंड शक्ती जीवनी ।।१२।।
शके एकोणतीसी । गुढी पाडवा दिनी ।। रामनवरात्र प्रारंभी। गुढी उभारली सर्वांनी ।।१३।।
रामनवमी तिथीसी । शुभ मुहूर्ती प्रातःकाळी ।। श्री मुऱ्हा देवी ऐसा ध्वनी। ऐकू आला स्पष्ट मजसी ।।१४।।
आकाशवाणी होती ती । परब्रह्म खेळ हा जगी ।। घटना त्या अदृश्यी। योजना पूर्ण परब्रह्माची ।।१५।।
माहीती कोणतीच नाही। मुऱ्हा देवीचे कार्याची ।। माहात्म्य मुऱ्हा देवीचे परी। लिहिण्या मज मार्गदर्शन ।।१६ ॥
बुध्दिपलीकडची आली। मुऱ्हा देवीची प्रचिती ।। वाहक असे त्याचा मी। अतर्क्स ही शक्ती ।। १७॥
तुचि कर्ती आणी करविती। मनी नव्हते ना स्वप्नी ।। मार्गदर्शन जे घडले लिखाणासी । तेच लिहीतसे येथ ॥ १८ ॥
शुभ्र जटा शिरी । शुभ्र दाढी मिशाही || अशा दिव्य ऋषींनी। दर्शन दिधले मज रामनवमीसी ।। १९ ॥
दिसली पितळेची विठ्ठलमूर्ती । हात असती कमरेवरती ।। प्रकाश किरणे मूर्तीतूनी। सतेज ती विठ्ठलमूर्ती ।।२० ॥
श्री महालक्ष्मी गणोजाची। पोथी लिखाणा समयी ।। दृश्य दिसले हे जागृती। नमस्कार केला मी उठूनी ।। २१॥
श्री मुऱ्हा देवी दर्शनाचा । योग कधी नाही आला ।। फोटो श्री मुऱ्हा देवीचा। कधी नव्हता पाहिला ।। २२॥
कालंका गाथा प्रकाशन । सोहळा होता अकोट मंदिरात ।। 'मुऱ्हादेवी' ऐसे मार्गदर्शन। सृष्टीत तो चमत्कार ।।२३।।
दुसरे दिवसापासून । श्री मुऱ्हा देवी अदृश्यात ।। देऊ लागली प्रत्यय। तो ऐका तुम्ही भक्तगण ।।२४॥
जागृतीत शनिवार रात्रीस। स्वर्गातून देवी उतरुन ।। उभी राहीली माझे समोर । दिसले हात पाय शिर ।। २५॥
अंतर्धान पावता ते रुप । दिसले देवी मुखकमल ।। शिरी ऊंच रोप्य मुकूट। नेत्र अती तेजस्वी ।। २६॥
तद्नंतर ऋषी एक । बसला माझे जवळ ।। केले हस्तांदोलन अदृश्यात । शक्ती दिली लिखाणा ।। २७॥
हा अदृश्यी चमत्कार । माहात्म्य लिखाणा आशीर्वाद ।। दिधला ऋषीने मज। परब्रह्माचा खेळ हा ।। २८॥
'ओम्' नाद सर्व दूर । माया ती झाली प्रकट ।। भगवती माता ते नाम। प्रसिध्द ती विश्वात ।। २९।।
परब्रह्म शक्ती ते । अवतार अनेक तिचे ।। विशिष्ट कार्य करण्याते। अवतरली अवनीवरती ।।३०।।
मज दिसले दृश्य एक । तरुण त्रहषी सहकुटुंब ।। येत होते पैदल मार्गदर्शन मुहाक्षेत्री ।। ३१।।
प्रसन्नता अती मनी । तेजस्वीता मुखकमळी ।। लांब जटा असती शिरी। तप फळ असे ते ।।३२।।
विठ्ठल दर्शन घेऊनी । आले त्ररषी मुऱ्हा ग्रामी ।। ऐसा अर्थ या दृश्यातून । कळला मजसी येथ ।।३३।।
ऋषी बैसले माझे समोर । लिखाण कागद माझे समोर ।। कथा सांगती ऋषी मज। ऐसे दृश्य मी पाहिले ।। ३४ ॥
स्वर्गातूनी अवतरली देवी। स्थिर झाली मुहग्रामी ।। ऐसे दृश्य दिसले मजसी। वर्णन देवीचे करितसे ।। ३५।।
नऊवार लुगडे लाल । केले देवीने परिधान ।। बसली मांडी घालून। स्थिर रुपे ।। ३६ ||
प्रसन्न मुखकमळ । नासिका अती सरळ ।। तेजस्वी व्दय नेत्र। कुंकुम ते भाळी ।। ३७॥
ऊंच मुकूट शिरी । नथ नासीकेत शोभी ।। सुवर्णहार कंठी। ऐसे रुप सुंदर ।। ३८।।
ऐसी देवीची स्थापना। झाली अदृश्यात तेधवा ।। पुष्प वृष्टी करिती देवता। ऐसे दृश्य मी पाहिले ।। ३९ ।।
अष्ट्भाव दाटले मनी । स्फूरण जाहले त्या क्षणी ।। धृवपद आरतीचे झणी। प्रेरणे लिहिले प्रत्यक्षी ।।४०।।
"जयदेवी जयदेवी । जय मुहादेवी ।। जयजयकार तुझा । अंबीका रुपी।।धृ।। जयदेवी ।।४१।।
ऐसे आरतीचे धृवपद । लिखाणा झाला आरंभ ।। हाच देवीचा प्रसाद। लाभला मज गुरुकृपे ।।४२।।
इति बाळकृष्ण विरचित श्री मुऱ्हादेवी संक्षिप्त माहात्म्य लिखाणपूर्व अदृश्य मार्गदर्शन वर्णनंनाम प्रथमो ध्याय : समाप्तः ।।
॥ श्री ॥
श्री गणेशायनमः। श्री गुरुभ्योनमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री मुहादेव्यैनमः। श्रीसरस्वत्येनमः ।
प्रथमाध्यायी देवी दर्शन। तसेच ऋषींचे मार्गदर्शन ।। माहात्म्य लिखाणा आदेश । दिधला जागृतीस्वप्नी ।।१॥
प्रथम अध्यायानंतर मज। प्रकाश अग्नि दिसला स्वप्नात ।। गरुड, श्रीकृष्णाचे दर्शन । पेढा प्रसाद दिला देवीने ।।२।।
दोन नारळ दिसले समोर । दुसरा अध्याय लिहीण्यास ।। प्रेरणा ती अदृश्यात। दिधली मज देवीने ।।३।।
त्या प्रेरणे व्दितीयाध्याय । लिखाण झाले प्रत्यक्ष ।। त्यातील सर्व वर्णन । अदृश्य सृष्टीचे मार्गदर्शने ।।४।।
प्रथम दिसली अंबा देवी। नऊवार लुगडे नेसलेली ।। नथ नासीकेत मोत्याची । नासीका ती सरळ ।।५।।
मग दिसले ऋषी एक। करीत होते धारणा ध्यान ।। शतचंडी आदि यज्ञ याग। ऐसा क्रम त्यांचा असे ।।६।।
ऋषींचे उजवे बाजुस । भुयार होते पायऱ्यासहित ।। ऋषर्षीचे समाधीस्थान । दिसले मजसी अदृश्यात ।।७।।
श्री मुऱ्हा देवीचे चिंतन । सुरु जाहले अखंड ।। देवी पुराण पठणास । मिळाली मजसी प्रेरणा ।।८।।
देवी पुराण वाचता । मुहादेवी नव्हती कथा ।। ती अदृश्यातून कळली मजला । त्याचे वर्णन करीतसे ।।९ ।।
घटना ऐसी दिसली । जी का पूर्व घडली ।। ज्या योगे देवी अवतरली । मुऱ्हा ग्रामे ।।१० ।।
शहानुर नदी तीरी । मुऱ्हा ग्रामाचे परीसरी ।। अंजनगाव दर्यापूर ह्यामद्धी । ऋषी करिती तपश्चर्या ।।११ ।।
मूर दैत्य अधिपती । सत्ता त्याची ह्या क्षेत्री ।। त्रास त्याचा सर्वांसी। विघ्न्न आणी यज्ञात ।। १२ ।।
ध्यान धारणेत बाधा। हा दैत्याचा असे बाणा ।। त्रास अति देवी भक्ता। धावा देवीचा करिती ते ।। १३ ।।
महिला नित्य स्नानासी । जाती प्रभाती नदीवरी ।। मूर दैत्य येई त्या समयासी । कुदृष्टी त्याची स्त्रियांवर ।।१४॥
तपस्वी त्यांचे पती । प्रसन्न त्यांना देवी ।। अवतरली ती अंशरुपी । त्या स्त्रियांसमवेत ।।१५।।
ऋषीपत्नी व कन्यासमवेत । जात होती स्नानास ।। पाहूनी तिचे रुप मनोहर। कुविचार आले दैत्या मनी ।।१६।।
मूर दैत्य अश्वारुढ । धरण्या आला देवीस ।। देवी झाली सिंहारुढ । अष्टभूजा रुप प्रकटले ।।१७।।
सुवर्ण मुकूट शिरी । आठ शस्त्रे हाती ।। ऐसी सिंहारुढ देवी। सरसावलीं युध्दास ।।१८।।
देवी - मूरदैत्य युध्द । झाले अतिघनघोर ।। चालले तीन दिवस । झाला पराभव दैत्याचा ।।१९॥
दैत्य प्रबळ जरी । देवीपुढे तो हिंपुटी ।। घनघोर त्या संग्रामी । दैत्यासी त्या पराभवीले ।।२०।।
मूर दैत्यासी मारीले । मुहादेवी नाम पावले ।। या क्षेत्री प्रसिध्द झाले । अनेकांचे कुलदैवत ते ।।२१।।
त्रासले होते सर्वजण । मूरा मारिता आनंदीले जन ।। करिती नरनारी उत्सव । जयजयकार देवीचा करिती ।।२२।।
मारिता मूर दैत्यासी । देवीने बदलेले स्वरुप ।। घेतले सौम्य रुप । तेजस्वी ते अती ।।२३।।
शक्तीचा तो जयजयकार । भरला नादे आसमंत ।। वर्षले कंठी हार अनंत। कळला महिमा देवीचा ।। २४।।
आज प्रत्यक्ष देवी मंदिर । उभे आहे भव्य दिव्य ।। देवीचे अभिषेक पूजन। करिती फक्त स्त्रिया परी ।। २५।।
मंदिरापासूनी दूर । आहे महादेवाची पिंड ।। त्याखाली केले कैद । दैत्यांसी तेथ देवीने ।। २६।।
त्यांचे हात पाय बांधून । ठेविले देवीने भूयारात ।। तो साखळदंड आज। आहे देवीचे पायाखाली ।। २७।।
ऐसी मान्यता जनात आहे आजही ग्रामात ।। त्या घटनेचे अवशेष आहेत जीवंत आजही ।। २८।।
चैत्र पौर्णिमेस प्रतिवर्षी । सात बंडीगाडयामधुनी ।। सुवासीनीसी बैसूनी । ओढत आणिते एक व्यक्ती ।।२९।।
हनुमान मंदिरापर्यंत । गाड्या आणे गावाबाहेरुन ।। ऐसी प्रथा अजुन पर्यंत । सुरु आहे ग्रामात ।।३०।।
अर्थ त्याचा मजला । कळला प्रेरणे आजला ।। पराभव करुनी दैत्यांचा । सोडविले अनेक सुवासिनींस ।।३१।।
त्यांना आणूनी सोडिले । मुक्त करुनी देवीने ।। मंदिरापर्यंत मारुतीचे। बंडी गाडीने सात ।।३२।।
त्या घटने ही प्रथा । सुरु असवी आता ।। परी कार्यकारणभाव त्याचा । माहीत नसावा कोणास ।।३३।।
ग्रामी जे विठ्ठल मंदिर । ते असे अतिपुरातन ।। जे असे ऋषर्षीचे आराध्य । त्याची खुण असे ती ।।३४।।
आणखी एक पुरातन पुरावा । सापडला होता खोदकाम करीता । आसमंतात सांगाडा अस्थिंचा ध्यानस्थ बैसल्या व्यक्तीचा ।। ३५।।
ती असावी समाधी ऋषींची। जो कां होता येथे तपस्वी ।। त्याचे भक्तीने देवीसी । यावे लागले प्रत्यक्ष ।। ३६।।
हनुमान मंदिर अजुन । आहे अति पुरातन ।। ती असावी ग्रामवेश । मुऱ्हा ग्रामाची तेधवा ।। ३७।।
ऐसी घटना कळली मार्गदर्शने । अदृश्य सृष्टीचे शक्तीने ।। त्या घटनेसी जुळते । आजची स्थिती ।।३८।।
देवीचे चरित्र सर्वा कळावे । मुऱ्हा ग्रामचे कार्य समजावे ।। ह्या करणे ऋषी, देवीने। दृश्य दाखविले मजसी ।।३९।।
जैसे दाखिवले दृश्य । तैसेचि केले लिखाण ।। त्यात नसे कमी अधिक। माझ्या हाताचे ।।४०।।
ऐसे देवीचे अनेक भक्त । होऊन गेले आसमंतात ।। झइंग्रजी महाराज मुख्य त्यात । होते ते निःसिम भक्त ।।४१।।
मंदिर त्यांचे परिसरात । कार्य त्यांचे सर्वश्रुत ।॥ भक्त येति अनेक । दर्शनास महाराज, देवीच्या ।।४२।।
इति बाळकृष्ण विरचित श्री मुऱ्हा देवी संक्षिप्त माहात्य श्री देवी- मुरुदैत्य संग्राम तथा दैत्य मर्दन वर्णनंनाम द्वितीयाध्यायः समाप्तः ।।